समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थीनीने लिहिलेला लेख विषय - कोरोना : आव्हाने आणि उपाय

 


विषय - कोरोना : आव्हाने आणि उपाय


वाशीम येथील रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊन काळात कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना आणि त्यासंबंधी विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या या लिखाणाला चालना देण्यासाठी आम्ही त्यांनी लिहिलेले लेख प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.


लेख दुसरा - 


विषय - कोरोना : आव्हाने आणि उपाय


 कोणता रूग्ण हा कोरोना विषाणु संक्रमित आहे हे सुद्धा माहित नसते. अश्या परीस्थितीत त्यांच्या वर उपाय करत असतांना डॉक्टर वर देखील या विषाणुचा हल्ला होतो. यात काही डॉक्टर आणि कर्मचारी यांचा जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत.  या युद्धजन्य परिस्थितीत ते लढता लढता शहीद झाले आहेत.


आपण बघत आहोत की, गेल्या काही महिन्यांपासुन एक जीवघेणा विषाणु जगभरात पसरल्याने सर्वत्र हाहाकार पसरलाय. या विषाणुमूळे कितीतरी लोक मृत्यू मुखी पडले आहेत आणि पडत आहेत. या विषाणुचे नाव ‘कोरोना’ आहे. हा विषाणु मानवी शरिरात प्रवेश करुन शरीर निकामी करून व्यक्तीचा  जीव घेतो. या विषाणुचा वाढता प्रसार रोखण्यासाठी म्हणजेच त्यावर उपाय शोधण्यासाठी जगात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रथम चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊन आता चार महिने झाले असून, या विषाणुचा संसर्ग आता जगभरात पसरला आहे. चीन, अमेरीका आणि युरोपिय देश कोरोनावरील लस आणि औषधे शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कारण जो देश आधी लस शोधेल, तो देश त्या देशात राहणार्‍या जनतेला उपलब्ध करून देईल आणि कोरोनामुळे तयार झालेल्या आर्थिक संकटातून लवकरात बाहेर पडेल. 
या विषाणुमुळे आज सगळे जग संकटामध्ये आहे. वाढत्या मृत्युचे प्रमाण बघता असे निदर्शनास  येते की, जर या विषाणुवर लवकरच उपाय निघाला नाही तर सगळे जग हे नष्ट होण्याची शक्यता आहे. कोरोनासारख्या भयंकर विषाणूला आज जग सामोरे जात असुन प्रत्येक व्यक्ती हा भयभित आहे. पण याला कारणीभुत कोण ? निसर्ग की मनुष्य ? माझ्या मते निसर्गाला दोष देता येणार नाही. कारण निसर्गाचा वारेमाप उपभोग घेणारा मनुष्य हा आज स्वार्थी झालाय. स्वत:चा फायदा कशामध्ये होईल त्यामागे पळु लागलाय.  दुसर्‍याची चिंता काळजी न करता आत्मकेंद्री जिवन जगु लागला आहे. त्याचाच परिणाम आज जगासमोर दिसुन येतोय. ते म्हणजेच कोरोनासारख्या विषाणुच्या रूपात मनुष्याच्या स्वार्थीपनाचे  लक्षणे दिसण्यास सुरूवात होते.            
 या गंभीर विषाणुपासुन जनतेचे रक्षण करण्याकरीता आपला जीव वाचवण्याकरीता जे सेवक सेवा देत आहेत. ते स्वत:चा जीव हातावर व स्वत:च्या कुटुंबापासुन दुर राहुन रात्र-दिवस सेवा पुरवित आहेत. ज्या मध्ये डॉक्टर ज्यांना आज समाजाने देवाचे स्थान दिले आहे आणि पोलिसांमध्ये जनतेच्या रक्षणासाठी  उभा असलेला पाडुरंग दिसत आहे. पोलिस आणि डॉक्टरांचा कार्यभार कमी करण्यासाठी प्रत्येकाने फिजिकल  डिस्टन्स  ( phisicial  Distance) राखणे महत्वाचे आहे. ते कशा प्रकारे करता येईल तर  हात मिळविण्याऐवजी नमस्कार करा, सामाजिक मेळावे टाळा, शक्यतोवर  कमीत कमी सहा फुटाचे सुरक्षीत अंतर ठेवा, हे सर्व नियम जर आपण पाळले तर आपण निश्चितच सुरक्षीत राहु आणी कोरोनासारख्या विषाणुवर  मात करु शकतो. एवढेच करून भागणार नाही तर या विषाणुचा नाश करण्यासाठी आपल्याला स्वच्छता देखील बाळगायला हवी. या विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला स्वच्छतेची विशेष खबरदारी घ्यावीच लागणारं आहे.  ज्यामध्ये वारंवार  साबणाने हात धुणे, नाक-तोंड-डोळे यांना हात न लावणे, बाहेर जातांना मास्क वापरणे इत्यादी. 
धक्कादायक हे आहे की, मोठ्या प्रमाणात डॉक्टर, पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचारी देखील कोरोना झालेल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहेत.  एखादा व्यक्ती जेव्हा रुग्ण म्हणुन डॉक्टरांकडे येतो तेव्हा त्याला असलेल्या अडचणी जे काही त्रास आहे ते डॉक्टरांशी त्यावर बोलतो.  मात्र,  आज संपुर्ण जगात भितीदायक वातावरण निर्माण झाले असून जे रूग्ण डॉक्टरांच्या संपर्कात येतात ते रूग्ण कशाप्रकारचे असतील याचा विचार देखील करता येत नाही. कोणता रूग्ण हा कोरोना विषाणु संक्रमित आहे हे सुद्धा माहित नसते. अश्या परीस्थितीत त्यांच्या वर उपाय करत असतांना डॉक्टर वर देखील या विषाणुचा हल्ला होतो. यात काही डॉक्टर आणि कर्मचारी यांचा जीव देखील गेला आहे.  या युद्धजन्य परिस्थितीत ते लढता लढता शहीद झाले असेच म्हणावे लागेल. अनेक डॉक्टर, पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या हिमतीने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.  आणि स्वतःचा विचार न करता जनतेला दिलासा देत आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तिने त्यांच्या या त्यागाचा विचार करून शासनाने दिलेले निर्देश पाळले पाहिजे आणि ताळेबंदीचे काटेकोर पालन केले पाहिजे. 
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातला असतांना प्रत्येक देश आपआपल्या परीने या विषाणुशी लढा देत आहेत. आजही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. आपला देश देखील नेहमीच इतरांना मदतीचा हात देत राहिला आहे.  म्हणूनच भारत देशाने अमेरिकेला औषधांचा साठा पुरवला आहे.  त्याच प्रमाणे इतरही अनेक देश मदतीचा हात पुढे करून कोरोनाच्या साथीवर मात करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहेत. 
भारतीय सरकारने देशातील सर्व जनतेला दिलासा तर दिलाच, त्याचबरोबर आपल्या देशाची जनता उपासमारीला बळी पडू नये म्हणून जनतेला मोफत धान्य वितरण व्यवस्थादेखील केली. ज्याप्रमाणे प्रत्येक देश मदतीचा हात पुढे करत आहे त्याचप्रमाणे आपलेही काही कर्तव्य आहे. यात आपण सरकारला आर्थिक मदत करू शकतो. गरीब व मजूर यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करू शकतो. स्वत: रक्तदान करून लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करू शकतो.  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण घरात राहून हे युद्ध जिंकू शकतो म्हणून आपण सर्व या कठीण प्रसंगी ताळेबंदीचे पालन करू, या संकटातून लवकर बाहेर पडू आणि देशातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंब यांना सुरक्षीत ठेवू. कारण सध्याच्या घडीला खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. 


- पल्लवी कोठेकर 
समाजकार्य स्नातक भाग-1 
श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम