कोरोना आणि शेतकऱ्यांची व्यथा
कोरोना आणि शेतकऱ्यांची व्यथा
कोरोना विषाणु मुळे जागतिक संकट उभे राहिले आहे.या महामारीच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या संकट काळात जिवनावश्यक असलेला शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही . पिकावर केलेला खर्च ही भरुन निघत नाही .सावकाराची देनी थकीत आहेत.पुढील हंगामाच्या पुर्व तयारी साठी पैंशाची आवश्यकता आहे.त्यामुळे शेतीमाल विक्री साठी बाजार उपलब्ध होणे आवश्यक आहे.म्हणुन शेतकरी कोरोना महामारीच्या संकटात आपलं होणार आर्थीक नुकसान ,पुढे उदभवणाऱ्या अडचणी व शासना ने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे. उन्हातान्हात राबुन काळ्या आईच्या रानात दिवस रात राबतो घाम गाळुन कष्ट करतो. कधी कधी मनासारखं घडतं आणि शिवार वाऱ्यावर डुलतं मग मन बोलतं कि आता तु आबादीआबाद होणार असं वाटत पण अचानक मधातच एक अवकाळी पावसाच वादळ सुटतं आणि सोन्यासारख्या पिकाच्या मुळावर उठतं !
कधी अवकाळी पावसाच वादळ सुटतं तर कधी दूष्काळाच वादळ उठत यातच आम्हा शेतकऱ्याच आयुष्य फक्त कष्ट करण्यातच जात.बऱ्यापैकी पिकलं तर चांगला भाव मिळत नाही .व्यापार करणारा कधी मोठा होतो कळतच नाही.
आज महामारी संकटाच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणी उदभवल्या आहेत.कामधंदा नसलेल्या लोंकाना शासनाकडून व विविध सेवाभावी संस्थेकडुन खाण्या पिण्याची व्यवस्था करीत आहेत.मात्र शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात उत्पादित केलेला शेतीमाल तुर,हरभरा,गहु,ज्वारी ,विक्री अभावीच घरातच पडुन आहे .तर भाजीपाला,फळे या सारखा नाशवंत शेतीमाल शेतातच सडुन जात आहे.व्यापारी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लाखो रुपये उत्पादनावर खर्च करुन तयार केलेला माल कवडीमोल भावाने मागत आहेत.
शेतकरी आपला माल विकण्याकरिता ग्रामीण भाग व शहरी भागात प्रयत्न करीत आहे .मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे शेतकऱ्याला तेथेही पर्याय उरला नाही .या सर्व अडचणी मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.पुढील हंगामाच्या पुर्व नियोजनासाठी पैशाची अवश्यकता आहे. आपल्या कृषी प्रधान देशात कधी अवकाळी पावसामुळे तर कधी दूष्काळामुळे शेतकरी ढासाळला मात्र , आज या कोरोना महामारीच्या संकटामुळे शेतकऱ्याची अवस्था हि बारा गावगाड्यातील बलुतेदारा सारखी झाली आहे.शेतकऱ्याच्या श्रमाला मुल्यच नाही. शेती व्यवसायात तोटाच होत आहे.कोरोनाच्या संकटातुन जरी शेतकरी वाचला तरी कर्जबाजारी पणामुळे मात्र त्यांच्यावर जिवन संपविण्याची वेळ येईल. कारण शेतकऱ्यांची सद्यस्थिती फारच बिकट झाली आहे.शेतकऱ्यांचा लाखो रूपयांचा माल हा शेतात सडुन जात आहे.
त्यामुळे शेतकरी फारच ढासाळुन जात आहे.शेतकऱ्याचे नुकसान झाल्यावरही त्याला उपोषण आंदोलन केल्याशिवाय त्याच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई लवकर मिळत नाही.कर्जमाफी सुध्दा लवकर मिळत नाही यामुळे च सुमारे 80 टक्के शेतकरी आत्महत्या करतो.
शेतकऱ्यावर येणारी संकटे शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस ,ओला दूष्काळ ,कोरडा दूष्काळ,बाजारपेठेतील बाजार भावात होणारी घसरण ,शेतसाठी सावकाराकडून किंवा बँक इ.कडुन घेतलेले कर्ज ,परत फेडीची मुदत ,निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणा ऱ्या अनेक संकटाचा सामना करावा लागतो ,हवामानात अचानक बदलांमुळे शेतातील पिंकाचे नुकसान होते.हजारो रूपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो.पण त्याच्या कष्टाला दर वेळी फळ मिळतेच असे नाही .त्यात शेतकऱ्यासमोर हमीभावाची समस्या कायमच आहे. शेतकऱ्याने किती ही आंदोलन मोर्चे काढले तरी त्याच्या पिकाला हमीभाव मिळतच नाही.
शेतकऱ्यांना कधी आस्मानी ,तर कधी सुल्तानी संकटाना तोंड द्यावे लागते.त्याचे अवघे आयुष्य संघर्ष करण्यात जात आहे .यंदा पिकांची अवस्था चांगली असताना आणि बाजार समित्यांमध्ये माल विक्री जोरात सुरु असताना कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.
गहु हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते .गहु हरभरा बाजार समिती मध्ये नेण्याअगोदरच बाजार समित्या वरही लाॅकडाऊन चा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले.
त्यामुळे शेतकऱ्या समोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यांना शेतमालाची विक्री करता येत नाही आहे.त्याचे सर्व आर्थिक व्यहार ठप्प झाले.शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या उदरनिर्वाची चिंता सतावत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करतोय.म्हणुन शेतीमाल विकण्यासाठी शेतमालाची विक्री करण्यासाठी परवानगी उपलब्ध करून द्यावी शेतीमाल ,फळे ,भाजीपाला व त्याच बरोबर दुध विक्री करण्यासाठी सुध्दा परवानगी द्यावी कारण प्रत्येक शेतकऱ्या चा जोड धंदा हा दुध व्यसाय अाहे .त्यामुळे शेतकरी योग्य भावात मालाची विक्री करेल आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत व ग्राहकांची कोणत्याही प्रकारची लुट होणार नाही . महत्वाचे म्हणजे फिजिकल डिस्टसिंगचे नियम पाळले जातील.शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत योग्य तो निर्णय द्यावा.
बाजार समित्या कुठल्याही प्रकारचा धोका पत्कारण्यास तयार नाहीत अशी अवस्था दिसुन येत आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे.हा काळ फार अडचणीचा आहे,सरकारवर कोरोना विषाणु संकटामुळे आरोग्य व्यवस्थेपासुन तर नागरीकांच्या जिवाची व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे.
देशातील कृषी साखळी ही मज़बुत असुन बाजार समित्या त्यात मोठा दुवा आहे.या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दुर करण्यासाठी या कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर दूष्काळाची झळ सोसणाऱ्याना तातडीने संपुर्ण कर्जमुक्त करा, हेक्टरी किमान 50 हजार रुपये पिक नुकसान भरपाई ,पुरेसा वीज पुरवठा करावा,शौक्षणिक शुल्क माफी,वीजबिल माफी,रेशन ,अश्या सर्व मदतीच्या उपाय योजना तातडीने लागू करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्याचे मत आहे.
कु. मयुरी प्रविण अवताडे ( मालेगाव )
BSW 2nd year ,sem 4th
रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम