सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सुरवातीच्या काळातील कार्य
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष संपादकीय.
सत्यशोधक समाजाची स्थापना -
दि. ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा जोतीराव फूले यांचा जन्म झाला. ते बालपणापासुनच हूशार होते. त्यांचे शिक्षण, शिक्षणातील अडथळे, पुन्हा शाळा प्रवेश, लग्न, पत्नी सावित्रीबाईचे शिक्षण, शाळा काढणे, अनेक प्रकारच्या कुप्रथांना मूठमाती देवून जोतीराव समाजासाठी सारखे लढत राहीले. आता त्यांना समाजसेवेची पंचविस वर्षे झाली होती. सामाजिक बदल घडवितांना येणार्या अडीअडचणींचा पूर्णपणे त्यांना अनूभव येवून गेला होता. आता हा विचारांचा प्रवाह सतत पुढे सुरु ठेवायचा असेल तर लोकांच्या एकत्रीकरणाची मोट बांधण्याची गरज त्यांना वाटत होती. त्यावेळी त्यांच्या हेही लक्षता आले होते की, मनुष्याला निर्मीकाकडे पोहोचविणारा 'धर्म' हा एक मार्ग आहे. मनूष्याची निर्मीकावर व धर्मावर निसर्गतःच निष्ठा आहे. मनुष्याचा आत्मा हा ईश्वराचे एक रुप असून निती आणि सदाचाराने तो निर्मीक रुप बनू शकतो. मात्र यात एक मोठी आडकाठी उभी आहे. ती म्हणजे भट दलाल होय. या दलालांनी पोथ्या पूणारांची, मूर्तीपुजा, तिर्थयात्रा आदी अवडंबराची आडकाठी टाकून सामान्यांचे शोषण चालविले आहे. भिक्षूकी गूलामगीरीच्या पाशात येथील जनतेचे जिवन दडपून गेले आहे. शिक्षणाच्या अभावामुळे व योग्य मार्गदर्शन नसल्याने येथील जनतेने त्यांची गुलामी पत्करली आहे. या गुलामीच्या जोखडातून जनतेची सुटका करण्यासाठी आपण एकटे टिकणार नाही. हे जोतीरावांनी आधीच जाणले होते. याकरीता त्यांनी पूण्यात काही थोडेफार ब्राम्हणेत्तर तरुण जे नुकतेच शाळा शिकुन बाहेर पडले होते. त्यांचा उपयोग घेवून आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांना एक विनंतीपत्र लिहीले. आणि पूण्यात एक बैठक बोलावली. या बैठकीस पूण्यासह मुंबई व इतर आसपासच्या परिसरातील सुशिक्षीतांना निमंत्रणे दिली. ही बैठक दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी पूण्यातील तुकाराम नाईक यांच्या घर क्रमांक ५२७ येथे पार पडली. या बैठकीस ५० ते ६० लोक उपस्थित होते. या बैठकीस जोतीरावांनी आपले हेतू सर्वांसमोर ठेवले आणि अभ्यासपूर्ण भाषण केले. तेव्हा जोतीरावांच्या या कल्पनेवर बरीच चर्चा झाली आणि एक संस्था स्थापण्याचे निश्चित ठरले. आणि या संस्थेला 'सत्यशोधक समाज' हे नाव देण्यात आले.
या सत्यशोधक समाजाची तीन प्रमूख तत्वे ठरविण्यात आली. त्यामध्ये (१) ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विवाद, निर्गुण व सत्यस्वरुप आहे. व सर्व मनुष्य, प्राणी त्यांची लेकरे आहेत. २) ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे. आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनविण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरुरी नसते त्याचप्रमाणे परमेश्वराची भक्ती करण्यास भट दलालाची आवश्यकता नाही. ३) मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. तसेच राजकीय विषयावर बोलने वर्ज्य राहील. या तीन प्रमुख तत्वांसह प्रत्येक धर्मीयास मान्य होईलच इतक्या व्यापक स्वरुपात समाजाच्या कार्याची व्याख्या करण्यात आली आहे.
या बैठकीत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व खजीनदार म्हणून जोतीराव फुले यांनाच निवडण्यात आले. तर सेक्रेटरी (सचिव) पदावर नारायणराव गोविंदराव कडलक यांना निवडण्यात आले. यासोबतच मुंबईचे कै. समय्या व्यंकय्या अय्यावारु, नरसिंहराव सायक वडनाला. जाया यल्लाप्पा लिंगू, व्यंकु बाळोजी काळेवार, ग्यानबा मल्हारजी झगडे मिस्त्री, विधोबा बाळोबा साठी, धोंडीराम नामदेव कुंभार, गणपत राजाराम फुले, ग्यानोबा कृष्णराव ससाने, नारायणराव विठोबा शिंदे, महाबळेश्वर जवळील भिल्लारचे गोविंदराव भिल्लार आदींसह इतर उपस्थित लोक सत्यशोधक समाजाचे सभासद झाले. यावेळी सत्यशोधक समाजाच्या वाटचालीसाठी नियम व अटी तयार करण्यात आल्या. यापुढे संघटनवाढीच्या दृष्टीने रविवारी सर्व कामगारांना सुट्टी राहत असल्याने दर रविवारी ईश्वरोपासना आणि दर पंधरा दिवसांनी शनिवारी उपयुक्त विषयावर व्याख्याने देण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला. आणि हि बैठक समाप्त करण्यात आली. अशाप्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.
*सत्यशोधक समाजाची वाटचाल* -
सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर त्याची चर्चा लवकरच सर्वदूर पोहोचली. ज्या तत्वांना केंद्रस्थानी ठेवून सत्यशोधक समाज वाटचाल करु लागला. समाजाचा प्रसार प्रचार करत असतांना जोतीरावांना देवभोळ्या लोकांकडून विरोध होऊ लागला. हे देवभोळे लोक जोतीरावांशी वादविवाद करण्यासाठी येत असत. ईश्वराची प्रार्थना संस्कृत भाषेतून मंत्र म्हटल्याशिवाय ईश्वराला कळत नाही. या प्रश्नाचा जोतीरावांनी विरोध केला आणि लोकांना समजावून सांगीतले. ते लोकांना समजावून सांगतांना म्हणत की, प्रत्येक मनुष्याच्या मनात काय चालले आहे हे ईश्वराला समजत असेल तर, त्याला मराठी, कानडी, हिंदी, पारशी भाषा समजत नसतील असे आपण कसे काय म्हणू शकतो? अर्थात, मरु घातलेल्या अवघड अशा संस्कृत भाषेच्या नादी न लागता सर्वांनी आपल्या मातृभाषेतून ईश्वराची प्रार्थना करावी असे जोतीरावांनी जनतेला सांगितले. तसेच लग्न, मृत्यू व इतर संस्कार भट दलालांच्या मदतीने संस्कृत भाषेतून करवून न घेता प्रत्येकाने ते मातृभाषेतून करावेत असे स्पष्टपणे सांगितले.
यापूढे विवाह लावतांना तो सत्यशोधक विवाह पध्दतीने लावावा. या विवाहात भट दलालांना बोलवू नये. असे आवाहनच सत्यशोधक समाजाने केले. विवाह ही मानवाच्या जिवनातील अत्यंत महत्वाची मंगलमय घटना आहे. परंतू येथील भट दलालांनी त्याला कर्मकांडाचे स्वरुप देवून आपल्या रोजीरोटीची सोय केली. म्हणून जोतीरावांनी स्वत: मंगलाष्टके तयार करुन आपल्या पूरोहितामार्फत सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पाडले आहेत.
वराचे नियमाप्रमाणे धरुनी, चाले तुझे कुळ गे ॥
सत्याने अवघ्यात श्रेष्ठ असशी, तैसेच हे त्वसंगे ॥
अज्ञान्या समदृष्टीने शिकविशी, तू ज्ञान त्या दावीशी ॥
प्रितीने वरीतो तूला अजी तुझी, ऐकूनी किर्ती अशी ॥
शुभमंगल सावधान ॥
अशाप्रकारे मंगलाष्टके तयार करुन जोतीरावांनी आपल्याच हस्ते पहिला सत्यशोधक विवाह लावला. आणि वैदीक ब्राम्हणी विवाह परंपरेला छेद दिला.
जोतीरावांनी लावलेला हा पहिला सत्यशोधक विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी सीताराम जबाजी आल्हाट, जुना गंज पेठ, पुणे व ग्यानोबा निम्हणकर यांची मुलगी राधाबाई यांचा होता. या विवाहाचे सर्व सोपस्कार जोतीरावांनीच पार पाडले. ब्राह्मण भटजी शिवाय लागलेला हा भारतातील पहिला विवाह होय. या विवाहानंतर पुण्यातील ब्राम्हण खुपच हादरले. व त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला. त्रास देण्यास सुरुवात केली. परंतु जोतीराव डगमगले नाहीत. त्यांनी लगेच ६ मे १८७४ ला ग्यानोबा कृष्णाजी ससाने व काशीबाई नारायण शिंदे यांचा सत्यशोधक विवाह घडवून आणला. तर सातार्यातील भिलारच्या सत्यशोधकांनी पहिल्या वर्षी सहा तर दुसर्या वर्षी पाच लग्न ब्राम्हनांशिवाय लावले. अशाप्रकारे विवाहासह सर्वच संस्कार ब्राम्हणाशिवाय होवू लागले. जसजसे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते वाढत होते , तसतशा समाजाच्या कार्याच्या कक्षाही रुंदावत होत्या. गूलामगिरीचा नायनाट, शिक्षणाची चळवळ, स्त्री शिक्षणाचा प्रसार, स्त्रीयांच्या मानवी हक्कांचा पुरस्कार, दीन व्यक्तींवर भुतदया, सत्याचे आचरण, सत्यनिष्ठा या बाबींना केंद्रस्थानी ठेवून सत्यशोधक समाजाचे काम पुढे सरकत होते. हे सर्व होत असतांना पूण्यातील ब्राम्हणात पून्हा खळबळ उडाली. आणि त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून समाजाचे सभासद झालेल्यांना त्रास देणे सुरु केले. हा धर्मद्रोह आहे, ब्रम्हव्देश आहे असे ते सांगू लागले. एखादा सरकारी नोकर जर समाजाचा सभासद झाला तर त्याच्या खात्यातील लहान मोठे सर्व ब्राम्हण अधिकारी त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्याला कामावरुन काढण्याबद्दल ते गोर्या साहेबांना (इंग्रज) भांडावून सोडत. अशी अनेक उदाहरणे आहेत.
अशाप्रकारे सत्यशोधक समाजाला हाणून पाडण्यासाठी ब्राम्हण निकराचे प्रयत्न करीत होते. मात्र याला जोतीराव जराही डगमगले नाहीत. भिक्षूकशाहीच्या अशा फुसक्या विरोधाला भिण्याइतके जोतीराव कच्चे नव्हतेच मुळी. या ब्राम्हणविरोधामुळे त्यांना महाराष्ट्रभर सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनविण्याची हिम्मत मिळाली. आणि आपले काम सुरुच ठेवले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून शुद्रांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली, स्कॉलरशिप वाटल्या गेल्या.